धक्कादायक ! गडचिरोलीत जंगलात झाडाखाली गरोदर मातेची प्रसूती

पोलिसनामा ऑनलाईन –  घनदाट जंगल आणि त्यामधील नाल्यातील पाण्यामुळं जाण्यास नीट रस्ता नाही वाटेत पूर अशात एका आदिवासी महिलेची भर जंगलात झाडाखाली प्रसूती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणार्‍या उपकेंद्र गट्टाच्या झारेवाडा गावातील आदिवासी महिला भारती दोरपेटी या महिलेच्या पोटात दुखत होते. त्यानंतर आशा सेविकेने गट्टा आरोग्य उपकेंद्रात माहिती दिली. उपकेंद्रातील आरोग्य सेविका सोनी दुर्गे यांनी तात्काळ रुग्णवाहिका घेऊन गरोदर मातेला आणण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यात नाल्यावरून पुराचे पाणी वाहत होते. अशात रूग्णवाहिका काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र नाल्यावर एक मालवाहू ट्रक फसला होता. त्यामुळे रुग्णवाहिका झारेवाडा गावाच्या जवळ नेणे ही शक्य नव्हते. रूग्णवाहिका जाऊ शकत नाही ही बाब आरोग्यसेविका सोनी दुर्गे यांच्या लक्षात आली. त्यानंतर सोनी दुर्गे यांनी प्रसूतीला लागणार्‍या साहित्यासह ते गरोदर भारतीला जिथे घनदाट जंगलातील पायवाट रस्त्यातून आणले होते ते स्थळ गाठले. जंगलातच तिच्या प्रसूतीची तयारी सुरू केली. काही वेळात आरोग्यसेविका सोनी दुर्गे यांच्या अथक प्रयत्नाने आदिवासी भारतीची प्रसूती केली. नवजात बाळाचे वजन दोन किलो सातशे ग्राम असून पुढील उपचारासाठी दोघांनाही गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.