मुंबईतील कुख्यात गुंड चिपळूणमध्ये अटकेत, रेल्वेतून बाहेर पडताच पडल्या बेड्या

चिपळूण : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर स्वरुपाचे २० हून अधिक गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या एक महिन्यांपासून मुंबईतून फरार असलेल्या कुख्यात गुंडाला चिपळूण रेल्वे स्थानकावर गाडीतून उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले. सिद्धेश बाळा म्हसकर (वय ३६, रा. अंबरनाथ, ठाणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ठाणे पोलीस, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अंतर्गत ही कारवाई केली आहे.

सिद्धेश म्हसकर याच्यावर मुंबई पोलिसांच्या वॉंटेड यादीत खुनाचा प्रयत्न, तसेच गंभीर दुखापतीचे २०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने गुन्हेगारांची शोध मोहिम सुरु होती. त्यात तो फरार असल्याचे दिसून आले. तो कोकण रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने चिपळूण व रत्नागिरी पोलिसांना याची माहिती दिली. रत्नागिरी पोलीस तातडीने रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. पण तोपर्यंत गाडीने स्टेशन सोडले होते. त्यामुळे पुढे चिपळूण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी रेल्वे स्टेशनवर सापळा रचला.

सायंकाळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच पोलीस सावध झाले. त्यांनी म्हसकर याला पकडले. त्यापाठोपाठ ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक चिपळूणला आले. चिपळूण पोलिसांनी त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

Visit : policenama.com