‘कोरोना’चे नियम मोडणार्‍या अभिनेत्रीला BMC नं फटकारले, म्हणाले – ‘तुम्ही सेलिब्रिटी असाल म्हणून काय झालं नियम सर्वांना सारखेच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. गौहर खान हीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे असतानाही ती बिनधास्तपणे बाहेर फिरताना आढळून आली. परिणामी इतरांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तिच्या विरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

याबाबत महापालिकेने ट्विटद्वारे माहिती दिली आहे. शहराच्या सुरक्षितेसाठी आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. एका बॉलिवूड अभिनेत्रीने कोरोनाच्या निर्देशांचे पालन केले नाही. त्यामुळे आम्ही तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तुम्ही सेलिब्रिटी असाल किंवा सर्वसामान्य नागरिक नियम हे सर्वांसाठी समान असतात. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी कृपया प्रशासनाला सहकार्य करा, अशा आशयाचे ट्विट बीएमसीने केले आहे. सध्या पोलीस गौहरच्या रिपोर्टमध्ये काही छेडछाड झाली आहे का? याचा तपास करत आहेत. दरम्यान अभिनेत्री ओशिवरा भागात फिरत असल्याचे BMC च्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तिच्याकडून कोरोना नियमांचे पालनं होतंय का याची देखील तपासणी केली. या तपासाचा निष्कर्ष तिन नियम मोडल्याचा काढण्यात आल्याने BMC ने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.