लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडवर फेकले अॅसिड, बॉयफ्रेंडचा मृत्यू

लुधियाना : वृत्तसंस्था – एकतर्फी प्रेमातून मुलींवर अॅसिड हल्ले झालेले आपण ऐकले असेल. मात्र पंजाब मधील लुधियाना येथील एका प्रेमिकेने आपल्या प्रियकरावर अॅसिड फेकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसिला मंगळवारी (दि.१८) रात्री उशीरा अटक केली. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली होती.

लुधियाना पोलिसांनी सांगितले कि, खन्ना येथील राहणारी २३ वर्षीय तरुणी आणि २७ तरुणामध्ये एक वर्षापासून प्रम संबंध होते. काही दिवसांपूर्वी तरुणीने तरुणाकडे लग्नाची मागणी केली. त्यावेळी त्याने टाळाटाळ केली. तसेच त्याने आपण वेगवेगळ्या धर्माचे असल्याने आपल्याला लग्न करता येणार नाही आणि आपण केलेले लग्न घरच्यांना पसंत पडणार नाही. घरच्यांकडून लग्नाला परवानगी देखील मिळणार नसल्याने आपण लग्न करु शकत नसल्याचे तरुणाने तिला सांगितले.

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणी नाराज झाली. तिच्या मनात त्याच्याविषयी राग होता. २७ नोव्हेंबर रोजी या तरुणीने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्यांच्या वाद झाले. संतापलेल्या तरुणीने आपल्या सोबत आणलेले अॅसिड प्रियकराच्या अंगावर ओतले. यामध्ये प्रियकर गंभीर जखमी झाला. अॅसिड फेकत असताना अॅसिड तरुणीच्या अंगावर पडल्याने ती देखील जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाला पटियालामधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला चंदीगड येथील पीजीआई मध्ये दाखल करण्यात आले.

तरुणावर पीजीआई रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी (दि.१८) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करुन रात्री उशीरा अटक केली.