सिंहगड उतरताना विद्यार्थिनी जखमी

वेल्हे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगडावरून पायवाटेने उतरताना एक विद्यार्थिनी जखमी झाल्याचे समोर आले आहे. प्राची संजय कांदळकर (वय 15, रा. मुरगूड, कोल्हापूर) असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. पाय घसरून पडल्याने ती जखमी झाल्याचे समजत आहे. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी अकराच्या सुमारास अतकरवाडी पायवाट मार्गावरील खामकर मेटाजवळ घडली.
या घटनेनंतर सिंहगड वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी घटनास्थली धाव घेतली आणि जखमी प्राची हिला उपचारासाठी तातडीने गडाच्या पायथ्याशी आणले. तेथून तिला तात्काळ रुग्णालयात दाखलही करण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार, तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे.
गेल्या महिन्याभरापासून सिंहगडाच्या घाट रस्त्याचे काम सुरू असल्याने घाट रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. असे असले तरी शनिवार, रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी हजारो पर्यटक पाऊलवाटेने गडावर गर्दी करत आहेत. काल (रविवारी दि. 20) सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून पर्यटकांनी सिंहगड गजबजून गेला होता. शाळा, कॉलेजच्या सहली मोठ्या संख्येने पाऊलवाटेने येत आहेत. प्राची ही मुरगड येथील जय महाराष्ट्र विद्यालयात शिकत आहे. सहलीनिमित्त ती गडावर आली होती. परंतु पाय घसरून पडल्याने ती जखमी झाली.
सहलीतील विद्यार्थिनी पडल्याची माहिती मिळताच खामकर मेटावर तातडीने वन खात्याचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे, वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक नितीन गोळे, नीलेश पायगुडे, रमेश खामकर, बबन मरगळे, शंकर सांबरे, उत्तम खामकर, गुलाब भोंडेकर आदींनी धाव घेतली. या घटनेनंतर मात्र गडावर चढाई करताना व उतरताना शिस्तबद्धपणे ये-जा करावी, असे आवाहन सिंहगड वन विभागाने केले आहे.