‘निभर्या’प्रकरणाची नगरमध्ये पुनरावृत्ती, तरुणीवर वाहनातच ‘अत्याचार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार करण्याच्या घटनेने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती. त्याचीच पुनरावृत्ती अहमदनगरमध्ये झाल्याचे समोर आले आहे. नोकरीनिमित्ताने खासगी वाहनाने शहरात येत असलेल्या तरुणीवर वाहनचालकाने वाहनातच अत्याचार केल्याची घटना स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रुस मैदानाजवळ घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नगर तालुक्यातील टाकळी काझी परिसरातील २१ वर्षाची तरुणी नोकरीनिमित्ताने दररोज नगर शहरात येते. मंगळवारी सायंकाळी ही तरुणी आईसोबत नगर जामखेड रस्त्यावर वाहनाची वाट पहात थांबली होती. जामखेडकडून नगरकडे येताना तिने एका पिकअप वाहनचालकाला हात केला. या वाहनचालकाने गाडी थांबविली. आईला निरोप देऊन ही तरुणी या वाहनात बसली.

गाडीत या दोघांशिवाय कोणी नव्हते. वाहनचालकाने नगरजवळ आल्यानंतर क्लेरा ब्रुस मैदानाजवळ गाडी थांबविली. गाडीचे दरवाजे, काचा बंद करुन या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर वाहनचालक तेथून पळून गेला. या तरुणीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईबरोबर ही तरुणी कोतवाली पोलीस ठाण्यात गेली. तेथे तिने फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com