हॉटेलमधील वेटरलाही सन्मान द्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शाळा नाही, क्लास नाही, अभ्यासासाठी पुरेशी साधने नाहीत. मात्र, काही ध्येयवेडी चिमुरडीसुद्धा खेळण्या-बागडण्याच्या वयात दिवसभर हॉटेलमध्ये काम करतात आणि रात्र शाळेत अभ्यास करतात. विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचला आहे. कामधंदा करून शिक्षणाची एक एकपायरी चढत नोकरी व्यवसायामध्ये अनेकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यातीलच गौरव नरवत याने बारावीच्या परीक्षेमध्ये 77 टक्के गुण मिळवले, ही बाब कौतुकास्पद आहे. वेटर असला म्हणून काय झाले, त्यालाही मान-सन्मान आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट याप्रमाणे वेटरला आदर दिला, तर तो तुम्हाला आदर देणारच हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये गेलो आणि स्थानापन्न झालो. तेवढ्यात स्मार्ट वेटर ट्रे मध्ये थंड पेय घेऊन आला, गुड इव्हिनिंग म्हणत स्वागत केले. त्यावेळी उत्सुकता वाढल्याने त्याचे नाव विचारले तर रोहित असे सांगितले. पुढे उच्च शिक्षित दिसतोस म्हटल्याबरोबर त्याने हसून स्वागत करून पदवीधर असल्याचे सांगितले. एमपीए सुरू आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वेटरचेकाम करून शिक्षण घेत असल्याचे सांगितले. त्याला पुढील शिक्षणासाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तो पुढे त्याच्या कामाला लागला. अशा कर्तृत्ववान व्यक्तीचा मला सार्थ अभिमान आहे.

हॉटेलमध्ये काम करत असताना ग्राहकांचा मानापमान सहन करावा लागतो. विद्येचे माहेर घर असलेल्या मेट्रोपोलिटीन सिटीमध्ये साध्या हॉटेलपासून पंचतारांकित हॉटेल्सची खच्चून गर्दी होत आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबर नोकरी व्यवसायासाठी तरुणांचा ओढा पुणे शहराकडे सुरू झाला आहे. शिक्षण घेतल्यानंतर सरकारी किंवा खासगी मनासारखी नोकरी मिळत नाही, त्यामुळे अनेकांनी इतर मार्गाकडे मोर्चा वळविला आहे. अलिकडे प्रत्येक क्षेत्रातील डिग्री, डिप्लोमा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेकजण हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घेत आहेत. शिक्षणानंतर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी झेप घेत असून, काहींनी फिल्मी दुनियेतही प्रवेश केला आहे. त्यातील अनेक नाट्य कलावंत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. तर अनेकांनी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेतली आहे, त्याचबरोबर काहीजण अधिकारीपदावर विराजमान झाले आहेत. कष्ट करून उच्चपदापर्यंत पोहोचल्यानंतर समाज घडविण्यासाठी योगदान देण्यासही कमी पडले नाहीत.

हॉटेल व्यवसायामध्ये मोठा बदल झाला आहे. हॉटेलमधील स्वच्छता आणि चकचकीतपणा तसेच झकपकीत पोषाखातील वेटर ग्राहकांचे स्वागत करीत असतात. ग्राहक स्थानापन्न होताच वेटर मेनूकार्ड देत आदबीने चौकशी करून ऑर्डर घेतो. वेटर आणि कूक हे दोन वेगळे पार्ट आहेत. वेटरने ऑर्डर स्वीकारून कूककडे द्यायची आणि त्याने बनवल्यानंतर वेटर ग्राहकांना आणून देतो. मात्र, एखाद्या मेनूची चव बदलली किंवा काही गडबड झाली, तर वेटरला ग्राहक सुनावत असतो. तरीसुद्धा वेटर त्रागा न करता सर, स्वारी, दुसरी प्लेट आणून देतो, असे म्हणून पुढे कार्यरत राहतो. ही सल त्याला दिवसभर आणि घरी गेल्यानंतरही स्वस्थ बसू देत नाही. मात्र, आपण हा व्यवसाय स्वीकारला आहे, त्यावर आपले पोट आहे म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या कामात तो गुंतवून घेतो.

शहरातील अनेक हॉटेल्समध्ये कूकच्या चुका आणि अस्वच्छतेचा त्रास वेटरला सहन करावा लागतो. वास्तविक या घटनांना वेटर जबाबदार नसतो, तरीसुद्धा ग्राहक वेटरवर खेकसत असतो. ग्राहकांनी वेटरसुद्धा माणूस आहे, हे विसरू नका असा सबुरीचा सल्ला द्यावासा वाटतो. वेटरलासुद्धा मन आहे, त्याच्या भावना समजून घ्यायला शिका, त्याला मानसन्मान द्या, त्यासाठी खर्च करावा लागत नाही. फक्त दोन शब्द चांगले बोला, माणुसकीचा झरा वाढेल याची अनुभुती आल्याशिवाय राहणार नाही.