Coronavirus : 15 मे पर्यंत ‘शाळा-कॉलेज’, ‘मॉल’ आणि ‘सामूहिक धार्मिक कार्यक्रम’ स्थगित करा, केंद्रीय मंत्री गटाची ‘शिफारस’

नवी दिल्ली : देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊन आणखी वाढविला जाणार असल्याची चर्चा जोरात असतानाच सर्व शैक्षणिक संस्था, मॉल १५ मे पर्यंत बंद ठेवाव्यात. तसेच धार्मिक सामुहिक कार्यक्रमांवर निर्बंध घालावेत, अशी शिफारस केंद्रीय कोविड १९ वरील मंत्री गटाने केली आहे.

सरंक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी उपाय योजनांबाबत पंतप्रधानांना शिफारस करण्याचे काम मंत्रिगटावर सोपविले आहे.  या शिफारसीची आढावा घेऊन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निर्णय घेणार आहेत.


सध्याचा लॉक डाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. असे असेल तरी किमान ४ आठवडे धार्मिक ठिकाणे, शॉपिंग मॉल्स आणि शैक्षणिक संस्थांना कामकाज सुरु करण्यास देण्यात येऊ नये. उन्हाळी सुट्ट्या मे महिन्याच्या मध्यात सुरु होत असल्याने शाळा आणि महाविद्यालये जूनअखेरपर्यंत बंद ठेवण्याचा सरकार विचार करीत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक संघटनांना १५ मेपर्यंत कार्यक्रम घेण्याची परवानगी देऊ नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. मंत्रिगटाने संसर्गाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांतील तपासणी सुविधा वाढविण्यासाठी उपाय योजण्याचीही शिफारस केली आहे.

या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, अर्थ मंत्री निर्मला सितारामन, पीयूष गोयल, रामविलास पासवान, धमेंद्र प्रधान, नरेंद्रसिंह तोमर, रमेश पोखरियाल निशंक,  डी़ व्ही़ सदानंद गौडा, स्मृती इराणी हे उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like