Coronavirus : आता नाकात औषध टाकून ‘कोरोना’ला रोखणार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केलं जाणारं संशोधन सध्या प्रगतीपथावर आहे. आता अमेरिकेतील संशोधकांनी नाकात टाकता येणारं औषध विकसित केलं आहे. त्यामुळं व्हायरसला प्रतिबंध करता येणार आहे. उंदरांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचे चांगले परिणाम दिसून आल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

या औषधाची खासियत अशी की, जर हे औषध नाकात टाकलं तर ते व्हायरसला श्वसननलिकेत अटकाव करते. बहुतांशवेळा हा व्हायरस श्वसननलिकेतून शरीरात प्रवेश करतो हे सिद्ध झालं आहे. त्याला रोखण्याचा मार्गदेखील हाच आहे असं तज्ज्ञांचं मत आहे.

जरी कोरोनावर लस तयार झाली तरी ती जगभर कशी पोचवायची ही समस्या सध्या जगासमोर आहे. यावर जागतिक आरोग्य संघटना WHO नं एक मेगा प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन सर्व देशांना दिला जाणार आहे. जरी याची अंमलबजावणी सक्तीची नसली तरी तो मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोगी पडणार आहे.

WHO नं असंही म्हटलं आहे की, जर कोरोनावर लस आली आणि ती फक्त प्रगत देशातील लोकांनाच दिली गेली किंवा मिळाली तर ते जगावरचं आणखी एक मोठं संकट असेल. लस आली तर ती सर्वाधिक गरज असलेल्या भागात आधी पोहोचवावी. यानंतर गरजेनुसार त्याचा क्रम असावा. गरीब देशांनाही ती योग्य वेळेत मिळावी.

लस तयार झाल्यानंतर याचं अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं आणि ती लस जगातल्या काना कोपऱ्यात पोहोचवणं एक मोठं आव्हान आहे. पुण्यातील सीरम ही औषध निर्माता कंपनी यात मोठी भूमिका बजावणार आहे.

2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत कोरोना व्हायरस पृथ्वीवरून नष्ट होईल अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यासाठी स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी वेळ लागेल असंही WHO नं सांगितलं आहे. सध्या कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट झाल्यानं कोरना वेगानं पसरताना दिसत आहे.