पुणेकरांसाठी मोठी खुशखबर ! आता मॉलमध्ये पार्किंग फ्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क आता बंद होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुण्यातील मॉलमध्ये पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीची आज बैठक झाली. या समितीने हा निर्णय घेतला. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व मॉलमध्ये पार्किंग निःशुल्क करण्यात आले आहे. याविषयी पुण्यातील सर्व मॉलला नोटीसही पाठवण्यात येणार आहे. आज झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मॉलमधील निःशुल्क पार्किंगविषयी ठराव मांडण्यात आला. या ठरावाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात मॉलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी पुणेकर नेहमीच गर्दी करताना दिसून येतात. अशावेळी पार्किंगची सुविधा मॉलकडुन उपलब्ध करून देण्यात येते. दुचाकीच्या पार्किंगसाठी १० ते २० रुपये तर चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी ४० ते ५० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे आता हे पार्किंग शुल्क रद्द होणार आहे.