महिलांना सैन्यात एन्ट्री खुली, असा भरा ऑनलाईन अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशसेवा करू इच्छिणाऱ्या महिलांचे स्वप्न आता पुर्ण होणार आहे. भारतीय सैन्यात आता रणरागिनीही आपलं शौर्य दाखवू शकणार आहेत. कारण भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून भरती होण्यासाठी आता महिलांचीही भरती केली जाणार आहे. महिलांची भरती प्रक्रिया ऑनलाई सुरु झाली आहे. त्यामुळे रणरागिनींना आपले शौर्य दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

यापुर्वी भारतीय सैन्यदलात महिलांची भरती केली जात नव्हती. १९९२ पासून अधिकारी पदावरच महिलांची भरती केली जात होती. जगभरातील काही मोजक्याच देशांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सैन्यात लढण्याचे स्थान दिले जाते. परंतु पुरुषांची मक्तेदारी असलेले हे क्षेत्र वेगाने बदलत आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी पदभार स्विकारल्यानंतर महिलांची भरती करण्याचा निर्णय घेतला. महिला युद्धभूमीवर याव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मागील वर्षी तीन महिलांना फायटर पायलट म्हणून संधी देण्यात आली होती. तर भारतीय लष्करामध्ये महिलांची भरती करण्याला संरक्षण दलानेही आता मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता जवानांच्या समकक्ष पदांवर महिलांची भरती करण्यात येणार आहे.

इंडियन आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. कमीत कमी १० वी पास, वय १७ ते २१ वर्षे, उंची १४२ सेंमी, अशी शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे लग्न न झालेल्या महिलाच त्यासाठी अर्ज करू शकतात. तसे प्रतिज्ञापत्रही लिहून द्यावे लागणार आहे.

त्यासाठी www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर भेट द्या.