गुगल डूडलच्या माध्यमातून केला ज्येष्ठ भारतीय अभिनेत्रीचा सन्मान

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीयनाटय आणि चित्रपट क्षेत्रावरही अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्या कार्याला आज गुगलने सलाम केला आहे. डूडलच्या माध्यमातून गुगलने सेहगल यांच्या कामाची दखल घेतली आहे. हे डूडल पार्वती पिल्लाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार्‍या आणि ठसा उमटवणार्‍या पहिल्या काही भारतीय कलाकारांपैकी एक असणार्‍या अभिनेत्री आणि नृत्यांगना जोहरा सेहगल यांच्या कार्याचा यामाध्यमातून गौरव करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या काही अविस्मरणीय भूमिकांमध्ये निच्चा नगर चित्रपटातील भूमिकेचाही समावेश आहे. हा चित्रपट 1946 साली कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाला या फेस्टीव्हलमधील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच द पाल्म डीयोर पुरस्कार मिळाल होता. दरम्यान, सेहगल यांनी विविध नाटके, दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांसह त्यांनी बॉलीवूड व इंग्रजी चित्रपटांमध्येही चरित्र भूमिका केल्या होत्या. ‘ग्रॅण्ड ओल्ड लेडी’ या नावाने बॉलीवूडमध्ये परिचित असलेल्या जोहरा यांनी सन 2007 मध्ये शेवटची भूमिका रंगविली होती, संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटात. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जोहरा यांना 2010 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. 10 जुलै 2014 रोजी दिल्लीमध्ये जोहरा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.