पोलीस उपअधीक्षकाला गुंडांकडून मारहाणीचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेने उभारलेल्या वाहनतळावर मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी केली जात असून तेथे ठरलेल्या दरापेक्षा दुप्पट, तिप्पट पैसे मागितले जातात. पैसे नाही दिले तर प्रसंगी शिवीगाळ, मारहाण केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. पण आता चक्क पोलीस उपअधीक्षकांनाच त्याचा फटका बसला. नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळावरील गुंडांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांना बुधवारी रात्री आठ वाजता मारहाण करण्याचा आणि त्यांच्या कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अरुण पुजारी (वय २२), अभिजित रमेश झोपे (वय २३), आकाश अंकुश पिलाणे (वय २३), गणेश बसप्पा जंगले (वय २३), ऋतिक शेखर म्हेत्रे (वय १९, सर्व रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन 

याप्रकरणी दत्तात्रय भापकर (वय ४७, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. भापकर हे बुधवारी सायंकाळी आपल्या पत्नी व मुलीला घेऊन खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर आले होते. त्यांनी शिवाजीराव आढाव वाहनतळावर कार पार्क करुन ते खरेदीला गेले. तेथून अर्धा तासात परत आले व गाडी घेऊन निघाले. नियमाप्रमाणे त्यांनी पार्किंगचे १० रुपये दिले. तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने हाताने त्या पावतीवर लिहून ३० रुपये मागितले. तेव्हा भापकर यांनी मी अर्धा तासच गाडी लावली, तर त्याचे ३० रुपये कसे ते मला लेखी द्या असे म्हणाले. त्यावर तुम्हाला ३० रुपये द्यावेच लागतील, असे त्यांना सुनावण्यात आले. त्यावेळी तेथेच खुर्चीवर बसलेल्याने कोण आहेस ते, खूप शहाणा झालास काय, बघतोय तुझ्याकडे असे म्हणत भापकर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर १० ते १५ जणांनी त्यांना कारमधून बाहेर ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भापकर यांची पत्नी व मुलगी खूप घाबरुन गेल्या.

हेही वाचा – नाईट शिफ्टला निघालेल्या डोंबिवलीच्या ‘त्या’ 3 नर्स परतल्याच नाहीत  

त्यांच्या गाडीच्या पुढील बाजूला बांबुने व लाथाबुक्क्यांनी मारुन कारचे नुकसान केले. त्यानंतर भापकर यांनी विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दिली. तोपर्यंत हे गुंड पळून गेले होते. पोलिसांनी त्यातील ५ जणांना अटक केली आहे.