तृतीयपंथीयांना सरकारकडून महिन्याला 1500 रुपयांचा ‘भत्ता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. हातावर पोट असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये चहाविक्रते, रिक्षावाले, लहान-मोठे दुकानदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कामगार वर्गालाही अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. याच बरोबर वेश्या व्यवसायातील महिला व तृतीयपंथीयांना देखील या संकटाचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे तृतीयपंथीय संघटनांनी सरकारकडे पत्र लिहून मदत करण्याची मागणी केली होती. आता सरकारकडून तृतीयपंथीयांना मदत देऊ केली आहे.

सामाजिक न्यायमंत्री थावर चंद्र गहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून, तृतीयपंथीयांना मदत भत्ता देण्यात आल्याची माहिती दिली. ज्यांनी मदतीची मागणी केली होती, त्या तृतीयपंथीय नागरिकांना प्रत्येकी दीड हजार रुपये प्रति महिना असा भत्ता देण्यात आल्याचे थावर यांनी सांगितले. देशातील जवळपास 4922 नागरिकांच्या खात्यात 73 लाख रुपयाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

NBCFDC कडून कोरोना दरम्यानच्या लॉकडाऊन कालावधीत सोशल विलगीकरण किंवा इतर कारणास्तव तृतीयपंथीय नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या मानसिक तणावाचा विचार करून, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांना गाईडलाईन करण्यात येत आहे. देशात 14 एप्रिलपासून हेल्पलाईन जारी करण्यात अल्याचेही थावर यांनी सांगितले.

तृतीयपंथीय समुहाच्या दोन हजार पेक्षा जास्त जणांनी गृह, वित्त आणि सामाजिक न्याय विभागाकडे पत्र लिहून विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. देशातील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत, तृतीयपंथी यांना तीन हजार रुपये दरमहा भत्ता देण्याची मागणी त्यांनी केली होती, मात्र सरकारने दीड हजार रुपये भत्ता मंजूर केला आहे.