ESIC संदर्भात सरकारचा मोठा निर्णय ! बेरोजगार कामगारांना मिळणार 50 % वेतन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकटात बेरोजगार औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे. कामगार मंत्रालयाने अटल विमा कल्याण योजनेंतर्गत मदत वाढविण्याच्या निर्णयाला अधिसूचित केले आहे. यामुळे ईएसआयसी सदस्य कर्मचार्‍यांना 50% बेरोजगारीचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 40 लाख कामगारांना होऊ शकतो.

या कर्मचार्‍यांना मिळणार लाभ
सरकारने नियम लवचिक बनवत असा निर्णय घेतला होता कि, कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांपर्यंत पन्नास टक्के बेरोजगारीचा लाभ देण्यात येईल. 21 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोकरी गमावलेल्या कामगारांना हा लाभ देण्यात येईल. अटल विमा कल्याण योजना ही कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ईएसआयसी द्वारा संचालित एक योजना आहे.

तसेच ही योजना 1 जुलै 2020 पासून एका वर्षासाठी वाढविण्यात आली असून ती 30 जून 2021 पर्यंत लागू राहील. दरम्यान, 1 जानेवारी 2021 मधील मूळ तरतुदी पुनर्संचयित केल्या जातील. सुधारित अटींमध्ये या योजनेच्या कक्षेत आलेल्या 41,94,176 कामगारांना या योजनेचा फायदा होईल आणि यामुळे ईएसआयसीवर 6710.68 कोटी रुपयांचा बोजा पडेल. ईएसआयसी ही कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत एक संस्था आहे जी 21,000 रुपयांपर्यंतच्या कर्मचार्‍यांना ईएसआय योजनेंतर्गत विमा प्रदान करते.

तुम्हाला कसा फायदा होईल
त्याच्या आकडेवारीनुसार ईएसआयसी बेरोजगार कामगारांना हा लाभ देईल, परंतु यासाठी कर्मचारी कोणत्याही ईएसआयसी शाखेत जाऊन थेट अर्ज करू शकतात आणि योग्य पडताळणीनंतर हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचतील. यासाठी आधार क्रमांकही घेण्यात येणार आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या म्हणण्यानुसार कोरोना संकटामुळे जवळपास 1.9 कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. एकट्या जुलै महिन्यातच 50 लाख लोक बेरोजगार झाले.