मराठा आरक्षणाबाबत खा. संभाजीराजे आक्रमक, म्हणाले – ‘तुझं माझं करण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सोडवा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठा समाजाचा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नसल्याने वेळोवेळी भूमिका बदलत गेली आहे. काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचे असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी त्यांनी सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे देखील म्हटले आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले, उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असे सिध्द केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता 15 ते 25 मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलो नाही. 2007 पासून राज्य पिंजून काढला आहे. 2013 ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेंव्हा नारायण राणे समितीने दिलेले आरक्षण टिकल नाही. त्यानंतर 2017 ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता. तेंव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागेल म्हणून मला आलेल्या लोकांना परत जायला सांगावे लागले होते, असे ते म्हणाले.