‘इंधन दर वाढवून मोदी सरकारकडून लोकांना लुटण्याचा उद्योग’ : नवाब मलिक

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागत आहे. उत्पन्नाचे स्रोत कमी झाले आहेत. दुकानदारांना दुकान उघडता येत नाही. अशी एकूण बिकट परिस्थिती असताना जगात इंधन दर कमी होत असताना मोदी सरकारकडून मात्र पेट्रोल आणि डिझेल दर वाढवून लोकांना लुटले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेससचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले, तोक्ते वादळानंतर कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते गेले होते. यावेळी प्रसिद्ध झालेल्या फोटोत दोघांनीही एकसारखे नवीन बूट घातल्याचे दिसत आहेत. आता ते पुमाचे आहेत की नायकीचे हे माहीत नाही पण सर्व सामान्यांनमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात हे आश्चर्यच आहे असा टोला देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना लगावला.

कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी बनारस मॉडेलचा प्रचार करण्यात येत असल्याची टीका नरेंद्र मोदींवर करत मलिक म्हणाले, बनारसच्या घाटावर अंत्यसंस्कारासाठी जागा नव्हती. लोकांनी मृतदेह गंगा नदीत टाकले. त्याची जगामध्ये दखल घेतली गेली. त्यानंतर पंतप्रधान मोदी बनारस मॉडेल संदर्भात डीएम, डॉक्टर व रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्यामुळे बनारस मॉडेल काही नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.