Video : अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात भारताला प्रमुख अतिथीचा मान ; ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ने केले मराठीचे प्रतिनिधित्व

अबुधाबी : वृत्तसंस्था – अबुधाबी येथे आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे २९ वे  प्रदर्शन भरले होते. या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात भारताला प्रमुख अतिथी म्हणून मान मिळाला होता. त्यामुळे भारतीय भाषांतील साहित्य आणि साहित्यविषयक कार्यक्रम येथे आयोजित केले गेले होते. राष्ट्रीय पुस्तक न्यास, दिल्ली यांनी मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करायची संधी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ला दिली.  परदेशात राहूनही आपली भाषा जपण्याचा आणि नवीन पिढीपर्यंत पोचवण्याचा हा ध्यास घेतलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ च्या वारकऱ्यांनी १ तासात मराठी साहित्याची झलक दाखवण्याचे शिवधनुष्य उत्तम प्रकारे पेलले. ३० एप्रिल रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ चे  विनायक रानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची रूपरेषा –
Advt.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागात प्रचिती तलाठी यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ची माहिती सांगितली. नम्रता देव व पल्लवी बारटके यांनी गुरू ठाकूर लिखित प्रार्थना सादर केली. दुसऱ्या भागात विशाखा पंडित यांनी मराठीचा गौरव वाढविणाऱ्या वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या चार ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांची ओळख करून दिली. डॉ. पल्लवी बारटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेयस वाघमारे, शर्विल खटावकर, वेद गुप्ते, अर्चित शेपुंडे, पावनी बारटके, अनन्या कुमठेकर या बालवाचकांसह डॉ. प्रसाद बारटके, विजया सोनावणे आणि शीतल अंबुरे यांनी उपस्थितांना शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर, बहिणाबाई, बालकवी यांच्या काव्याची झलक दाखवली.
कविवर्य बा. भ. बोरकर आणि कोकणीतले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवींद्र केळेकर यांची माहिती देत रुपाली कीर्तनी आणि प्रशांत कुलकर्णी यांनी कोकणी साहित्यिकांची ओळख करून दिली. पु. ल. देशपांडे आणि गदिमा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त नीलिमा वाडेकर यांनी वंदन केले. देवेंद्र भागवत यांनी ‘असा मी असामी’मधील प्रवेश सादर करीत प्रेक्षकांना मनमुराद हसविले. आर्चित अग्निहोत्री यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. समिधा कचरेकर यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या मराठी संपादिका निवेदिता मदाने-वैशंपायन यांच्यासह उपस्थितांचे आभार मानले.