पत्रकार विक्रम जोशींचा हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू, गुंडांनी मुलीच्या समोरच घातली होती गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज (बुधवार) पत्रकार विक्रम जोशींचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सोमवारी रात्री काही गुंडांनी भररस्त्यात त्यांना मारहाण करून डोक्यात गोळी घातली होती. या हल्ल्याच्यावेळेस त्यांच्या दोन्ही मुलीही त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर जोशीं यांना रुग्णालयात नेलं होतं. तिथं त्यांच्यावर उपचार चालू होते. पण हल्ला इतका जोराचा होता की विक्रम जोशी या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान प्राण सोडला. या प्रकरणाबद्दल सध्या 9 जणांना अटक केली असून एका चौकी इंचार्जला निलंबित केलं आहे.

गाजियाबादमधील विजयनगर या भागात काही हल्लेखोरांनी अचानक पत्रकार जोशींवर हल्ला केला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये जोशी आपल्या दोन मुलींना घेऊन मोटारसायकलने जात असल्याचं दिसतंय. त्याचवेळेस जोशींवर हल्ला झाला.

पोलिसांनी आरोपींवर आइपीसी 307, 34, 506 या कलमांनुसार गुन्हे दाखल केले असून हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी आतापर्यंत मुख्य तीन आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे. फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी 6 टीम बनवल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पत्रकार जोशींनी विजयनगर पोलिसांकडे तक्रार केली होती की, काही मुलं त्यांच्या मुलींची छेडछाड काढतात. याचा त्यांनी विरोधही केला होता पण शेवटी त्यांच्यावरच हल्ला होऊन प्राण गमवावे लागले. यामुळे आता उत्तरप्रदेश मधील कायदा सुव्यवस्थेवर चांगलीच प्रश्नचिन्ह उभी राहत आहेत.