अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : शांत व्हा आणि एखादा चित्रपट पाहा, ग्रेटाचा ट्रम्प यांना सल्ला

वॉशिंग्टन: पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जवळजवळ निश्चित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये धावही घेतली, पण जॉर्जिया आणि मिशिगन मधल्या न्यायाधीशांनी ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली आहे.

याच पार्श्वभूमीवर स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विटवरुन ट्रम्प यांना त्यांच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. शांत व्हा आणि एखादा चित्रपट पाहा आणि रागावर नियंत्रण मिळवण्यावर थोडं काम करा असा टोला लगावला आहे.

ग्रेटाने हे ट्विट ट्रम्प यांच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतृत्वामधील स्विंग स्टेट्समध्ये मतमोजणी थांबवण्यासंदर्भात ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटवर उत्तर देताना केला आहे. त्यात तिने असे म्हंटले आहे की, “हे खूपच हस्यास्पद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या रागावर नियंत्रण न ठेवता येण्याच्या समस्येवर थोडं काम केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी आपल्या एखाद्या मित्राबरोबर छानसा जुना चित्रपट पहावा. शांत व्हा ट्रम्प.. शांत व्हा.

१६ वर्षीय ग्रेटाने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हवामान बदल थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे संघात हवामान कृती परिषदेसंदर्भात केलेलं वक्तव्य चांगलचं गाजलं होतं. या परिषदेला आलेल्या जगभरातील नेत्यांवर ग्रेटा संतापली होती. मागील वर्षी ग्रेटाला डिसेंबर महिन्यामध्ये ‘टाइम मॅगझीन’ने ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवले होते. त्यावेळी जगभरातील अनेकांनी ग्रेटाचे अभिनंदन केलं होतं. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना या निर्णय फारसा आवडला नव्हता. त्यावेळी त्यांनी ग्रेटाला रागावर नियंत्रण मिळवल्यासंदर्भात सल्ला दिला होता. ट्रम्प यांनी ट्विटवरुन ग्रेटावर निशाणा साधताना तिला शांत होत एखाद्या मित्राबरोबर चित्रपट पाहण्याचा सल्ला दिलेला.