BJP आमदाराचे कोरोनाबाबत वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती असल्याने त्यांना कोरोना होत नाही’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. असे असताना गुजरातमधील भाजपा आमदार गोविंद पटेल यांनी कोरोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे आमदार पटेल यांनी म्हटले आहे.

गोविंद पटेल हे राजकोट (दक्षिण) मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे असे तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना पटेल यांनी हे विधान केले आहे. जे खूप मेहनत करतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती आहेत. त्यामुळेच भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येने देशात तब्बल कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.