TikTok वर व्हिडिओ बनवून झाली ‘स्टार’, आता ‘मर्डर’च्या आरोपाखाली ‘अटक’

सूरत : वृत्त संस्था – गुजरातची बहुचर्चित टिकटॉक स्टार किर्ती पटेलला खूनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण दोन गटातील हाणामारीचे असल्याचे म्हटले जात आहे.

सूरतमध्ये राहणारी किर्ती पटेल स्वत:चे टिक टॉक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करू लागली, ज्यामुळे ती संपूर्ण गुजरातमध्ये लोकप्रीय झाली. परंतु, म्हणतात ना, किर्ती मिळवणे आणि पचवणे सर्वांनाच जमत नाही. असेच किर्ती पटेलच्या बाबतीत घडले आहे.

एक टिकटॉक व्हिडिओ बनवताना किर्ती पटेलच्या एका सहकार्‍याने भरवाड समाजाबाबत चुकीच्या शब्दांचा वापर केला होता. ज्यामुळे किर्ती पटेल आणि भरवाड समाजाच्या जय हो गु्रपमध्ये वाद सुरू झाला आणि एकमेकांना मारण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या.

दोन्ही ग्रुप टिकटॉक व्हिडिओ बनवून एकमेकांवर हल्ला करत होते. ज्यामुळे तणाव आणखी वाढला. सोमवारी संध्याकाळी हा वाद मिळवण्यासाठी टिकटॉक स्टार किर्ती पटेल भरवाड समाजाच्या लोकांसोबत बैठक घेऊन चर्चा करत होती. त्यावेळी दोन्ही बाजूकडील लोकांमध्ये कशावरून तरी जोरदार हाणामारी सुरू झाली.

मारहाणीदरम्यान किर्ती पटेलकडून आलेल्या कनु भरवाड याने रघु भरवाडच्या डोक्यात वार केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या रघु भरवाडने टिकटॉक स्टार किर्ती पटेल आणि तिच्या जोडीदारांच्या विरूद्ध सूरतच्या पूनगाम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली किर्ती पटेलला अटक केली.