गुर्जर आंदोलनाला हिंसक वळण ; आंदोलकांकडून जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक

जयपूर : वृत्तसंस्था – आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमधल्या गुर्जर समाजानं छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.  धोलपूरच्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाम केल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलकांनी तीन गाड्यांची जाळपोळ केली आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे.

धोलपूरचे पोलीस अधीक्षक अजय सिंह म्हणाले, ‘काही समाजकंटक आग्रा-मोरेना महामार्गावर हिंसक झाले. त्यांनी हवेत गोळीबारही केला. पोलिसांच्या एका बससह तीन वाहनांना आग लावली. दगडफेकही केली, त्याच चार सैनिक जखमी झाले. पोलिसांनीही आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी हवेत गोळीबार केला’.

दरम्यान, गुर्जर नेता किरोडी सिंह बैसला यांनी आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. राज्य सरकारने आमची मागणी पूर्ण करावी. जोपर्यंत गुर्जर समाजाला पाच टक्के आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशाराही बैसला यांनी दिला. सध्या या परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. तसेच पोलिसांचा देखील मोठ्याप्रमाणात फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

गुर्जर समाजाची आंदोलने
गुर्जर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत. सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे अशी या समाजाची मागणी आहे.  सध्या गुर्जरांना अतिमागास श्रेणीतून एक टक्के आरक्षण मिळत आहे. राजस्थानमध्ये गुर्जर, रायका रेबारी, गडिया, लोहार, बंजारा आणि गडरिया समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. गुर्जर आरक्षण आंदोलन १३ वर्षांपूर्वी २००६ मध्ये सुरु झाले आहे. गुर्जर आंदोलन वसुंधरा सरकारमध्ये चार वेळा तर गहलोत सरकारमध्ये दुसऱ्यांदा हे आंदोलन होत आहे. २००६ मध्ये केलेल्या आंदोलनावेळी गुर्जर आंदोलकांनी त्यांना एसटी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी केली होती.