अवघ्या १४० रुपयात तुमचं ‘प्रोफाइल’ विकलं जातयं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियाचा वापर करणे दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललं आहे. काही हॅकर्स नेटकऱ्यांचा डाटा चोरून मार्केट रिसर्च आणि कंपन्यांना विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १४० रुपयांत हा डाटा विकला जात आहे. ही रक्कम बिटकॉइन, लाइटकॉइन, डॅश यासारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे अदा केली जात आहे.

डार्क वेब या जागतिक वेबद्वारे ही डाटा चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. पासवर्ड, टेलिफोन नंबर आणि ई-मेल आयडीचा समावेश आहे. ही माहिती वेगवेगळ्या दराने विकली जात आहे. राजकारणी, सेलिब्रिटी यांच्या डाटाला जास्त किंमत मिळत आहे. काही जण २ डॉलर (१४०रूपये) प्रतिदिन या दराने तर काही जण महिन्याचे ७० डॉलर ( ४,९०० रूपये) या दराने हा डाटा विकत घेतात.

डार्क वेब म्हणजे काय ?
इंटरनेटच्या मागे जी माहिती साठविली जाते किंवा जी प्रक्रिया चालते ती आपण पाहू शकत नाही. याला डार्क वेब म्हणतात. डार्क वेबची सुरुवात १९९० च्या दशकात झाली. अमेरिकी लष्करानं त्यांची गोपनीय माहिती कुणाच्या हाती लागू नये यासाठी डार्क वेबची सुरुवात केली. आपण जे इंटरनेटवर पाहतो ते केवळ ४ टक्के आहे. उर्वरित ९६ टक्के इंटरनेट हे डार्क वेबमध्ये येते. डार्क वेब हे साध्या ब्राऊजरवर दिसत नाही. त्यासाठी टॉर ब्राऊजर लागतो. त्यांना ट्रॅक करणे जिकीरीचे आहे. यामध्ये हॅकिंग केले जाते.यावर जगभरातील हॅकर्सचा डोळा असतो.फसवेगिरी करणारे सुद्धा डार्क बेव वापरत असतात. इथं खोटे पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर आयडी प्रुफसुद्धा मिळतात. ही माहीत चोरल्यानंतर ती विकली जाते. पैसे दिल्यावर सर्व माहिती मिळते. भारतात डार्क वेबशी लढण्यासाठी विशेष कायदा नाही.