हडपसरमध्ये महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा सुरळीत

पुणे : मागिल तीन दिवसांपासून पाऊस आणि बुधवारी दुपारी चक्रीवादळामुळे वीज यंत्रणा कोलमडली. विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे फोन खणखणत होते. नागरिकांच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचा पाऊस पडत होता. तर प्रत्यक्षात वरुणराजा बरसत असताना चक्री वादळामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिनीच्या तारांवर पडल्याने तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होत होता. पाऊस-वारा सुरू असूनही महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून हडपसर परिसरातील विद्युतपुरवठा सुरळीत केला.

हडपसर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडल्याने तारा तुटून विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रासले होते. पाऊस आणि चक्रीवादळ सुरू होते. विद्युतपुरवठा खंडित असल्यामुळे दूरचित्रवाणी बंद होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांचाही त्रागा होत होता. अशा परिस्थितीत विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी फोन केला जात होता. वारंवार फोन करूनही फोन लागत नसल्याने नागरिकांची चिडचिड वाढली होती.

मांजरी फाटा, विठ्ठलनगर (पंधरा नंबऱ), लक्ष्मी कॉलनी परिसरामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून विद्युतपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा विद्युतपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पावसाळ्यामध्ये जुनी झाडे उन्मळून, तर पावसाने भिजल्यामुळे जड झालेल्या फांद्या तुटण्याचे प्रकार जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने धोकादायक झाडे आणि फांद्या छाटणी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, पुणे विभागातील महावितरणचे रास्ता पेठ मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, सतीष राजदीप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप दांडगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, सहायक अभियंता विकास तायडे, श्याम बंडापल्ले, कुंजीर, भिवसाने आणि कर्मचारी हनुमंत शेंडगे, राहुल नवले, गणेश देशपांडे, पवार यांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत सर्व विभागातील विद्युतपुरवठा सुरळीत केला.