काम न केल्यानं सुनेनं 82 वर्षाच्या सासूला केली बेदम मारहाण, नातवंडांनी व्हिडीओ केला व्हायरल

हरियाणा : वृत्तसंस्था – हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यातील सेक्टर-२३ मध्ये माणुसकीला लाजवेल असा प्रकार समोर आला आहे. एका ८२ वर्षाच्या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वृद्ध महिलेला तिच्या सुनेने मारहाण केली, कारण तिचा दोष फक्त इतकाच होता की ती घरातील कामे करू शकत नव्हती. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे आणि वृद्ध महिलेची सून व तिच्या आईविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वृद्ध महिलेचे वय ८२ वर्षांहून अधिक सांगितले जात आहे आणि तिला स्वत:हून चालताही येत नाही. परंतु मुलाची पत्नी तिला घरकाम करण्यास भाग पाडत असे आणि काम न केल्यास बेदम मारहाण करत असे. पण यावेळी या सूनेचा मारहाण केल्याचा व्हिडिओ तिच्याच मुलांनी व्हायरल केला. त्यानंतर आरोपी महिला घटनास्थळावरून फरार आहे.

आरोपी महिला नर्स म्हणून कार्यरत
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सेक्टर-२३ पोलिस चौकी प्रभारी कतार सिंह यांनी सांगितले की, महिला आरोग्य विभागात नर्स म्हणून काम करत आहे आणि गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. तिला लवकरात लवकर अटक केली जाईल.

पोलिसांनी म्हटले
या प्रकरणात पोलिस म्हणतात की, वृद्ध महिलेच्या मुलाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. वृद्ध महिलेच्या मुलाने पत्नीवर आणि आपल्या आईला मारहाण केल्याचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघेही फरार आहेत.