ठाकरे सरकारमधील ‘हे’ 2 दिग्गज मंत्री भाजप प्रदेशाध्यक्षांवर बरसले, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांचे पार्सल कुठे पाठवायचे हे फडणवीस ठरवतील’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मी परत कोल्हापूरला जातो हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांचे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्या हक्कावर गदा आणत कोथरूडमध्ये घुसखोरी केली. आता परत येणे म्हणजे कुलकर्णी यांच्यासह तेथील मतदार आणि भाजपचाही विश्वासघात आहे. ज्यांना पुण्यातील जनतेने निवडून दिले, त्यांचा हा अपमान असल्याचा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे पाटलांचे पार्सल रिर्टन कोल्हापूर पाठवायचे की, केंद्रात याचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील (minister of state for home Satej Patil ) यांनी लगावला आहे.

पुण्यात शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी आपण कोल्हापूरला परत जाणार असल्याचे विधान केले होते. यावर मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादांची कोल्हापूरला परतण्याची इच्छा म्हणजे पुढील चार वर्षे ते पुण्यात काम करणार नाहीत असा होतो. अशावेळी येथील मतदारांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल करून ते म्हणाले, सत्ता असताना त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते बारा वर्षे विधानपरिषद सदस्य असूनही पदवीधरांचे प्रश्न कायम राहिले. आता कोल्हापुरात येऊन तरी ते काय करणार? ते येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात ठेवायचे की दिल्लीला पाठवायचे याचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत, असा टोला मारताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘भाजपमध्ये दोन गट आहेत. फडणवीस आणि पाटील गटात वाद सुरू आहे. या वादातूनच त्यांना कुठे पाठवायचे हे ठरणार आहे. मूळात निवडणुका अजून चार वर्षानी होणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरला येतो या विधानास फारसा अर्थ नसल्याचे पाटील म्हणाले.

आता तो फार्म्युला आम्ही वापरला तर पोटदुखी का ?
कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी एकत्र येईल. भाजपने यापूर्वी अनेकदा निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा फॉर्म्युला वापरला आहे. आता तो आम्ही वापरला तर त्यांच्या पोटात का दुखते असा सवाल करून गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, भांडण नाही. सत्तेसाठी आणि जिंकण्यासाठी राजकारणात जे काही करावे लागते ते आम्ही करणारच आणि सरकार पाच नव्हे तर पंचवीस वर्षे टिकवणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.