Coronavirus : देशात 24 तासात 3390 नवे रूग्ण, 1373 ‘कोरोना’बाधित झाले बरे, आतापर्यंत 56342 बाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या २४ तासात देशात कोरोना संक्रमणाची ३३९० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. या दरम्यान १०३ लोकांचा मृत्यू झाला, तर देशात २४ तासांत १३७३ लोक बरे झाले आहेत. सध्या देशात कोविड-१९ ची ३७९१६ ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, शुक्रवारपर्यंत देशात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून ५६३४२ झाली आहे. तसेच देशात १८८६ लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. सोबतच देशात आतापर्यंत १६५४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात सध्या कोरोना विषाणूपासून बरे होण्याचे प्रमाण वाढून २९.३६ टक्के झाले आहे. देशात प्रत्येक ३ मधील एक रुग्ण बरा होत आहे. देशातील २१६ जिल्ह्यांत अद्याप कोणताही रुग्ण आढळलेला नाही. ४२ जिल्ह्यात २८ दिवसांपासून कोरोनाचे कोणतेही नवीन प्रकरण आढळलेले नाही.

तसेच २९ जिल्हे असे आहेत, जिथे २१ दिवस कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तर ४६ जिल्ह्यात ७ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नाही.

आरोग्य मंत्रालयाकडून माहिती दिली आहे की, लवकरच आकडेवारीचे विश्लेषण करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनची नवीन यादी राज्यांना देण्यात येईल.