Covid-19 चा प्रसार जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी घेतली ‘या’ तंत्रज्ञानाची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संक्रमण अजूनही वेगाने पसरत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगातील सर्व सरकारने लॉकडाऊन केले होते, ज्यात हळूहळू शिथिलता दिली जात आहे. हे सर्व असतानाही कोविड-१९ विषाणू हार मानत नाहीये. त्याचा प्रसार सतत होत आहे. शास्त्रज्ञांनी विविध देशांमध्ये कोविड-१९ महामारीच्या प्रसाराच्या तीव्रतेचा अंदाज लावण्यासाठी हवामान अंदाज तंत्रांचा वापर केला आहे. तसेच त्यांनी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या परिणामाचे देखील मूल्यांकन केले आहे.

ब्रिटनमधील रीडिंग युनिव्हर्सिटीच्या हवामान तज्ञांसह आंतरराष्ट्रीय संघाने डेटा समाविष्ट करण्याचे तंत्र वापरले. या तंत्रात माहितीच्या वेगवेगळ्या स्त्रोतांचा समावेश केला गेला, जेणेकरून येणाऱ्या काळात निर्माण होणारी परिस्थिती जाणून घेता येईल.

अभ्यास संघातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, या तंत्राचा उपयोग हवामानाचा अंदाज लावण्यासाठी केला जातो. अभ्यास संघाचे नेतृत्व करणारे ‘नोर्स नॉर्वेजियन संशोधन केंद्रा’चे प्रोफेसर गेर अ‍ॅव्हेंसेन म्हणाले की, या अभ्यासाचा एक प्रमुख निष्कर्ष म्हणजे आपण याबाबत अंदाज लावू शकतो कि कशा प्रकारे संक्रमणाला बळी पडणाऱ्या लोकांच्या संख्येत बदल होऊ शकतो.

हा अभ्यास वेगवेगळ्या परिस्थितीत कशी परिस्थिती उदयास येईल हे दर्शवेल आणि त्याद्वारे दीर्घकालीन अंदाज देखील व्यक्त केला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांनी म्हटले की याचा अर्थ असा आहे की, लॉकडाऊन नियमात झालेल्या बदलांचा काय परिणाम होईल याचा अंदाज लावण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.

कोरोना विषाणू संपूर्ण जगभरात पसरला असून जगभरात या विषाणूची लागण झालेल्या संक्रमितांची संख्या १.१० कोटीच्या वर गेली आहे. आतापर्यंत जगभरात या विषाणूमुळे ५.२४ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीतून ६१.५२ लाख लोक बरे झाले आहेत.