सिमी संघटनेवरील बंदीसंदर्भात पुण्यात २ दिवस सुनावणी 

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – सिमी या संघटनेवर बंदी घालण्या संदर्भातील सुनावणी पुण्यात होणार आहे. यासाठी बेकायदा कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिकरणाचा पुण्यात २ दिवसांचा दौरा होत आहे. ३ आणि ४ मे अशी २ दिवशी सुनावणी पार पडणार असून या दिवशी ज्यांना यासंदर्भात आपले म्हणणे मांडायचे आहे. त्यांनी शपथपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या दोन दिवशी सुनावणीकरता न्यायाधीश मुक्ता गुप्ता या उपस्थित राहणार आहेत. गुप्ता यांच्यासोबत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद, वरिष्ठ वकील तथा विशेष सरकारी समुपदेशक सचिन दत्ता हे देखील न्यायाधिकरणासोबत असणार आहेत. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठात यासंदर्भातील सुनावणी होणार असून तपासी अधिकाऱ्यांच्या साक्ष नोंदवल्या जाणार आहेत. या न्यायाधिकरणाच्या सुनावणीच्या कामकाजाकरीता राज्य शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे चौकशी अधिकारी मनोजकुमार सिंग, नवी दिल्लीतील गृह मंत्रालयाचे संशोधन अधिकारी हिरणमय बिस्वास यांची नियुक्ती केली आहे.  तरी सुनावणीवेळी ज्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी शपथपत्रासह ३ आणि ४ मे रोजी सकाळी दहा वाजता न्यायाधिकरणासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.