सावधान ! पुण्यात आजही अतिवृष्टीचा इशारा, आत्‍तापर्यंत 17 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहाकार उडवला आहे. पुण्यात एका रात्रीत पावसाने 12 बळी घेतले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. तर पावसामध्ये 60 जनावरे दगावली असून हवामान विभागाने आजही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पुण्यात झालेल्या पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. या पावसाचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. शहरात नाले, ओढे वळवून अनधिकृत बांधकामे झाली असून त्याचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. तसेच मदत आणि बचाव कार्य़ाला प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष करून कात्रज, आंबेगाव तसेच सिंहगड रोड परिसरात ओढे नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले.

पुण्यात सिंहगड रस्त्यावर वडगावजवळील नाल्यात अनेक वाहने अडकली आहेत. अडकलेली वाहने जेसीबीच्या सहाय्याने काढली जात आहेत. एनडीआरएफची तीन पथके यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून महापालिकेच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक भागातील विजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

Visit : policenama.com