माने प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धाडसाने मदतकार्य केले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पावसात अडकलेल्यांच्या मदतीसाठी पुण्यातील अनेक कार्यकर्ते धावून गेले आणि नागरिकांना मोलाची मदत केली अशी अनेक उदाहरणे ऐकू येत आहेत. सहकारनगरमधील रानी इंदुलिला, गोविंद माने प्रतिष्ठानच्या ७०,८० कार्यकर्त्यांनी सिंहगड रस्त्यावरील एकता नगर आणि परिसरातील सोसायट्यांमध्ये धाडसाने जावून मदतकार्य पोहोचवले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल माने यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, एकता नगरी भागातील मित्र मदन टाकळकर यांचा फोन आला. आमच्या भागात दोन दिवस वीज नाही, घरांमध्ये दूध नाही, तान्ही बाळे आहेत त्यांनाही दूध नाही, पिण्यासाठी पाणी नाही, मदत व्हावी अशी विनंती त्यांनी केली. हे समजताच दोन हजार बिस्कीटांचे पुडे, नऊशे लिटर दूध, पाचशे किलो डाळ आणि तांदूळ, साडेतीनशे मेणबत्तीची पाकिटे असे साहित्य दोन टेंम्पो, एक व्हॅन मध्ये भरून आम्ही निघालो. बरोबर दोनशे मीटर नायलॉन दोरही घेतला.

तिथे गेल्यावर लक्षात आले की श्यामसुंदर, जलपूजन, शारदा, स्काय रेसिडंन्सी, आनंद पार्क, राज अपार्टमेंट, राधाकृष्ण, पूजा पार्क, गायत्री, प्रथमेश अपार्टमेंट या इमारती पाण्यात अडकल्या होत्या. कमरेच्या पेक्षाही अधिक पाणी होते. गाडी पुढे जावू शकत नव्हती. दोनशे मीटर अलीकडे गाडी थांबवावी लागली. काही ठिकाणी छातीपर्यंत पाणी होते ही परिस्थिती लक्षात घेऊन नायलॉनच्या दोराचा वापर केला. पोहत जावून दोर बांधले आणि दोराचा आधार घेत खांद्यावर सामान घेऊन ते सामान सर्वांपर्यंत पोहोचविले. जीवनावश्यक साहित्य मिळाल्यावर रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देणारा होता. या मदत कार्यात एकता रहिवासी मंडळ, झेड.एल.ग्रुप, रॉयल ग्रुप आणि आदर प्रतिष्ठानच्या ८६ स्वयंसेवकांनी भाग घेतला.

आरोग्यविषयक वृत्त