पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात असणारी तणावपूर्ण स्थिती पाहता पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट देण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहता पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात येणाऱ्या चारचाकी वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अंत्यत गरजेच्या वेळीच वाहने आत सोडली जात आहेत परंतु आधी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे त्यानंतरच वाहने मंदिर परिसरात सोडली जात आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारातही कडोकोट बंदोबस्त आहे. मंदिरात प्रवेश करताना दारातच मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या तपासणीनंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश करता येत आहे. इतकेच नाही तर, मंदिराची जी प्रमुख द्वारे आहेत त्या सर्व द्वारांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिराच्या आवारात आणि मंदिरातही पोलीस आणि सुरक्षा रक्षक हे सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून आहेत. या सर्वांमुळे भाविकांची थोडी गैरसोय होत असली तरी सध्याच्या परिस्थीतीमुळे भाविकही पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना सहकार्य करत आहेत.
‘सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळ अधिवेशन गुंडाळलं
दरम्यान देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधिमंडळाचं अधिवेशन काल म्हणजेच चौथ्या दिवशीच गुंडाळण्यात आले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. अधिवेशन स्थगित करण्यापूर्वी सर्व गटनेत्यांची काल बैठक पार पडली. सकाळी साडे दहा वाजता झालेल्या या बैठकीत विरोधी पक्षानेही अधिवेशन स्थगित करण्याच्या निर्णयास सहमती दर्शवली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दुपारी एक वाजता अधिवेशन स्थगित केल्याची घोषणा केली. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार मुंबईत विधानभवन परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षेवर अतिरिक्त ताण येतो. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेलिकाॅप्टर दुर्घटना : नाशिकमधील शहीद सुपुत्रावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार