सांगलीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली शहरातील वारणालीतील गल्लीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा संजयनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वरणालीतील गल्ली क्रमांक १ येथील एका घरास सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन दोन पीडित महिलांची सुटका करुन एका महिलेला अटक केली.

रिना अनुप सोळंकी उर्फ स्वाती पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. स्वाती पाटीलवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात तीन तर मिरज शहर पोलिस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. पीडित महिलांना वेश्या व्यवसायास भाग पाडल्याप्रकरणीच या गुन्ह्यांची नोंद आहे.

वारणालीतील गल्ली क्रमांक एक येथील एका घरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने एका बोगस गिर्‍हाईकामार्फत स्वाती पाटील हिच्याशी संपर्क साधला. तिने त्याला वारणालातील घरी येण्यास सांगितले. त्यानुसार बोगस गिर्‍हाईकाला तेथे पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वातीला पकडले. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. स्वाती पाटील तिच्या फायद्यासाठी अडचणीत असलेल्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई निरीक्षक पिंगळे, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विद्या जाधव, भगवान नाडगे, विकास पाटणकर, कविता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तीन महिन्यांमध्ये सात अड्डे उध्वस्त

पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने मागील तीन महिन्यांत सात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये तीन लॉजवर कारवाई करण्यात आली असून चार ठिकाणी घरांमध्ये छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत आठ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोठेही छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्यास पोलिस मुख्यालयातील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी सांगितले.

जाहिरात