हिंसाचारात दिलासा देण्यासाठी पाठीशी उभे राहिले ‘मुस्लीम’ शेजारी, लावून दिलं ‘हिंदू’ जोडप्याचं लग्न

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तर पूर्व दिल्ली जळत होती, यामुळे मुस्लीम बहुल परिसरातील हिंदु कुटूंबाला आपल्या मुलीचे लग्न रद्द करावे लागले. हातावर मेहंदी आणि अंगावर हळदी चढवलेल्या सावित्री प्रसाद यांचा 25 फेब्रुवारीला विवाह होणार होता, परंतु वडीलांनी दिल्लीतील हिंसेमुळे एक दिवसानंतर विवाहाचे आयोजन केले.

सावित्री प्रसाद यांच्या वडीलांनी सांगितले की त्यांचे मुस्लिम शेजारीच त्यांच्या कुटूंबासोबत राहिले आणि त्यांच्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. सावित्री प्रसाद म्हणाल्या की, माझ्या मुस्लीम बांधवांनी मला वाचवले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणीच आले. त्या पुढे म्हणाल्या की कुटूंबीय आणि मुसलमान बांधवांमुळेच मला दिलासा मिळाला.

एका वृत्तानुसार, चांद बाग परिसरात सावित्री प्रसाद यांचे छोटेसे घर आहे, जेथे त्यांच्या विवाहाची तयारी सुरु होती. त्यांच्या घरापासून काही अंतरावर मुख्य रस्ता आहे, जो रस्ता युद्ध भूमी बनला होता, जेथे दुकाने आणि वाहनांची जाळपोळ सुरु होती. दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 38 झाली आहे.

सावित्री यांचे वडील भोदय प्रसाद म्हणाले, आम्ही छतावर चढलो आणि पाहिले तर चारही बाजूंना फक्त धूरांचे लोट दिसत होते. सोमवार, मंगळवार असाच प्रकार सुरु होता. ते म्हणाले हे भयानक आहे, आम्हाला शांतता हवी आहे. ते म्हणाले की या परिसरात मी अनेक वर्षांपासून मुसलमान बांधवांसह कोणत्याही अडचणीशिवाय राहत आहे.

भोदय प्रसाद म्हणाले, आम्हाला याची कल्पना नाही की या हिंसाचारामागे कोण आहे, परंतु ते माझे शेजारी नव्हते. येथे हिंदू आणि मुसलमानांमध्ये कोणतेही शत्रूत्व नाही. सोमवारी 24 फेब्रुवारीला हळद होती आणि त्याच दिवशी सावित्रीच्या हातावर मेहंदी लावण्यात आली होती. परंतु त्याच दिवशी या परिसरात हिंसा भडकलेली होती.

सावित्री म्हणाल्या, त्यादिवशी बाहेर गोंधळ सुरु होता, परंतु मी मेहंदी लावलेली होती, आम्हाला अपेक्षा होती की दुसऱ्या दिवशी सगळं काही ठीक होईल. परंतु परिस्थिती आणखी बिघडत गेली. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी वर मुलाच्या पक्षाशी बोलून विवाह पुढे ढकलला.

सावित्री यांच्या शेजारी समीना बेगम म्हणाल्या की, आम्हाला याचे दु:ख होते की ज्या दिवशी मुलगी आनंदी असायला हवी होती, त्या दिवशी ती घरात बसलेली होती. बुधवारी हिंसा कमी झाली होती, परंतु बाजार बंद होते आणि लोक घराच्या बाहेर पडणे टाळत होते.

सवित्री यांच्या वडीलांनी सांगितले की त्यांनी मोठ्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले नव्हते. सावित्री यांची चुलत बहीण म्हणाली, हिंदू असो किंवा मुस्लीम, आम्ही सर्व माणूस आहोत आणि आम्ही सर्वजण हिसेंना घाबरलो आहोत. हा लढा धर्मासाठी नाही परंतु त्याला तसे वळण दिले जात आहे.

लग्नामुळे मुस्लीम शेजारी सावित्री यांच्या घरी जमू लागले होते. वर मुलगा घरी आल्यानंतर मुस्लीम शेजारी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमा झाले होते. पाहुण्यामधील अमिर मलिक म्हणाले, आम्ही आमच्या हिंदू भावांसोबत शांततेत जगतो, आम्ही त्यांच्यासाठी सर्व काही आहोत, यामुळे आज येथे उपस्थित आहोत.

भोदय प्रसाद म्हणाले, आज आमच्या नातेवाईकांपैकी कोणीही मुलीच्या विवाहात सहभागी होऊ शकले नाहीत परंतु आमचे मुस्लीम शेजारी येथे उपस्थित आहेत, ते आमचे कुटूंब आहे.