…तर गृहिणींना दरमहा पगार देणार; कमल हासन यांची मोठी घोषणा !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंतची चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर अभिनेते कमल हासन यांनी मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाची स्थापना केली. त्यानंतर आता त्यांचा पक्ष तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यास गृहिणींना दरमहा पगार देऊ असे आश्वासन कमल हासन यांनी दिले आहे. त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सध्या तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हासन यांनी केलेल्या घोषणेचे कौतुक केले आहे.

तमिळनाडू विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यासाठी कमल हासन यांनी प्रचार सुरू केला आहे. पक्ष सत्तेत आल्यास कोणकोणत्या योजना राबवल्या जातील, याची माहिती द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. ‘शिक्षण, रोजगार आणि उद्योगांच्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देण्यात येईल. गृहिणींकडे अनेकदा समाजाचं दुर्लक्ष होत असते. त्यांच्या कामाला महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मासिक वेतन देईल. त्यामुळे महिलांची प्रतिष्ठा वाढेल. यासाठी पक्ष सुशासन आणि आर्थिक विषयांसंदर्भात सात कलमी कार्यक्रम राबवेल, असे हासन यांनी म्हटले आहे.

आपल्या पक्षाचा अजेंडा जनतेसमोर ठेवताना कमल हासन यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. भ्रष्टाचारात बरबटलेले लोक जनतेला नको आहेत. जनतेला त्यांच्यापासून सुटका हवी आहे. आमच्या पक्षाला जनतेकडून खूप प्रेम मिळत आहे. जनतेला भ्रष्ट मंडळी नकोत, तर बदल हवा आहे, हेच यातून दिसते असे हासन यावेळी म्हणाले. काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी कमल हासन यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केले आहे. गृहिणींना मासिक वेतन मिळाल्यास त्यांना ओळख मिळेल असे थरूर यांनी म्हटले आहे.