‘नागपूर शहरातील नंबर एकचा गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता ? देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले होते. ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यावेळी गृहमंत्री पद देखील त्यांच्याकडेच होते. त्यावेळी हत्येच्या घटना सुद्धा घडल्या. याची संपूर्ण राज्यभर चर्चा होती. त्यावेळी नागपूरसह राज्यात कशी काय गुंडगिरी वाढली? तसेच नागपूर शहरातील नंबर एकचा गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता आहे? याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावे? असा सणसणीत सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यालाच गृहमंत्र्यांनी अमरावतीत प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीवर पोलिस खात्याकडून १०० टक्के कारवाई केली जात आहे, तर पोलिसांवर हल्ला करणाऱ्याची कुठल्याही परिस्थिती गय केली जाणार नाही. तसंच गुंड मुन्ना यादव हा फरार होता. तेव्हा आमचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. गुंड मुन्ना यादव याचा खरा तपास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा मोबाईल तपासावा. त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचे खरे लोकेशन मिळेल, असा आरोपही त्यावेळी मुंडे यांनी केलेला होता.