गृहमंत्री अनिल देशमुख यांची गच्छंती अटळ?, पुणे जिल्हयातील ‘या’ नेत्याकडे सोपविली जाऊ शकते HM पदाची जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाराष्ट्र सरकारवर हल्ला केला आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार देशमुख यांना गृहमंत्री पदावरून लवकरच निरोप दिला जाऊ शकतो.

असे म्हटले जात आहे की, अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून हटवून, त्यांच्या ठिकाणी दिलीप-वळसे पाटील यांच्याकडे पद सोपवले जाऊ शकते. दिलीप वळसे-पाटील सध्या ठाकरे सरकारमध्ये लेबर आणि एक्साईज मिनिस्टर आहेत. म्हणजे वळसे-पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री होऊ शकतात.

मुंबईचे माजी CP परमबीर सिंह यांच्या आरोपाने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. विरोधक सातत्याने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहेत आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांना कोणत्याही स्थितीत आपले सरकार वाचवायचे आहे. त्यांनी म्हटले की, अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून हटवावेच लागेल.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर मोठा आरोप केला आहे. शरद पवार यांनी परमबीर सिंह यांच्यावर हल्ला केला, शिवाय आपल्या पार्टीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना सुद्धा ते दिसून आले. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा पाठराखण केली.

मात्र, शरद पवार यांनी हे सुद्धा म्हटले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि सध्या त्यांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय झालेला नाही, परंतु उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल.

शरद पवार यांनी म्हटले, पत्राद्वारे अनिल देशमुख यांच्या चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाही. या दरम्यान, पवार यांनी सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर उपस्थित झालेल्या प्रश्नालाही उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, वाझे यांची नियुक्ती गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. वाझे यांच्या नियुक्तीचा निर्णय परमबीर सिंह यांचा होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री दत्तात्रय भरणे हे पुणे जिल्हयातील असून त्यापैकी गृहमंत्री पदाची जबाबदारी ही दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपविली जाऊ शकते. सध्या दिल्लीमध्ये त्याबाबत चर्चा देखील सुरू आहे.