‘आपण यात लक्ष घालावं’, फायनान्स कंपन्यांच्या तगाद्याविरोधात रोहित पवारांची गृहमंत्र्यांना विनंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महिला बचत गटांनी आणि वाहनधारकांनी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत व्यवसाय सुरू केला होता. मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामळं लॉकडाऊन लागल्यानं अनेक बचतगट डबघाईला आले आहेत. तरीही फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुली पथकाकडून बचत गटाच्या महिलांच्या घरी जाऊन हप्ते वसुलीचा तगादा लावला जात आहे. महिलांना वर कर्जधारकांना मानसिक त्रास दिला जात आहे. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणतात, “कर्जाच्या हप्त्यासाठी सवलत देऊनही काही खासगी वित्तीय संस्था वसुलीसाठी तगादा लावत आहेत. यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून कर्जदारांना धमकावण्याचे प्रकार होते आहेत. यामुळं लोकांमध्येही दहशत दिसत आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख आपण दखल घ्यावी ही विनंती.” या पोस्टमध्ये रोहित पवारांनी अनिल देशमुख यांना टॅग केलं आहे.

https://twitter.com/RohitPawarSpeak/status/1300698126148202497?s=20

लॉकडाऊनच्या काळात आधीच उपासमारीची वेळ आली असताना कर्जाचे हप्ते फेडायचे की, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असं असताना शासनानं फायनान्स कंपन्या व बँकांना कर्ज वसुलीबाबत काही निर्देश दिले होते. मात्र तरीही काही खासगी फायनान्स कंपन्या त्रास देत कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत.

वसुली पथकाची दंडेलशाही सुरू आहे या जाचाला कंटाळून बचतगटांच्या महिला व वाहनधारकांमध्ये तीव्र संताप आहे. वाहनांचे हप्ते फेडण्यासाठीची मॉरिटोरियमची मुदत 31 ऑगस्टला संपत आहे. ही मुदत वाढवून द्यावे व व्याज माफ करावं आदी मागण्यांसाठी वाहतूक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बँका व कंपन्यांसमोर निदर्शनं केली. मागण्या मान्य न झाल्यास 10 सप्टेंबर रोजी सर्व वाहने बँक व फायनान्स कंपन्यांमध्ये जमा करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.