पुणे : घर फोडून 6 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनाइनला – शहरतील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, कोंढव्यात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 3 फ्लॅट फोडून साडे सहा लाख रुपयांचा माल पळविला आहे. ही घटना २३ जानेवारी ते 4 फेब्रुवारी कालावधीत उंड्रीतील लॅन्डमार्क सोसायटीत घडली आहे. चंदा जाजू (वय ३५, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा गृहिणी असून त्या उंड्रीतील लॅन्डमार्क सोसायटीत राहायला आहेत. २३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी कालावधीत चंदा मुलाकडे राहायला गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील लॅपटॉप, सोन्याचे दागिने रोकड असा ६ लाख २४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डी.डी. बर्गे अधिक तपास करीत आहेत.

केअरटेकरने जेष्ठ नागरिकाला लुटले –
कोथरूड भागात एका जेष्ठ नागरिकाच्या घरी केअरटेकर म्हणून नोकरीस असणाऱ्यानेच गळ्यातील सोन साखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. त्याला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १६ नोव्हेंबरला कोथरुडमधील डावी भुसारी कॉलनीमध्ये घडली होती. गणेश बाळू पवार (वय ३५, रा. सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संदीप लोहकरे (वय ५०, रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप खासगी कंपनीत कामाला असून त्यांच्या वडिलांची देखभाल करण्यासाठी २०१८ पासून गणेश केअर टेकर म्हणून काम करत होता. १६ नोव्हेंबरला घरामध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेउन गणेशने संदीपच्या वडिलांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी चोरुन नेली होती. त्यानंतर  पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील अधिक तपास करीत आहेत.