काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले – – ‘…मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात रेमडीसीवीर इंजेक्शन वरून सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस भिडले आहेत. त्यात आता लसीकरणावरून काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस याने कोरोना लसीचा डोस घेतल्यांनंतर तो फोटो समाज माध्यमावर प्रसारित केला यावरून काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

काँगेस म्हणाले आहे की, ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे असं असताना देवेन्द्र फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल काँगेसने ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. तर पुढे त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, तन्मय फडणवीस ४५ वर्षापेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचासुद्धा गुप्त साठा आहे का? असा घनघोर प्रश्न काँगेसने मांडला आहे.

या दरम्यान, कोरोना लस देण्यावरून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, यामध्ये प्राधान्याने आरोग्य कर्मचारी, वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेले नागरीक यांना लस देण्यात येते. परंतु, तन्मय फडणवीस यांना कोरोना लस दिल्याचा फोटो व्हायरल झाल्याने देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. तसेच, तन्मयचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. तर तन्मय फडणवीस यानेही इन्स्टाग्राम खात्यावर त्याचे लस घेतलेल्या फोटो टाकले होते. प्रसारित झाल्यावर त्यानंतर तातडीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा फोटो डिलीट केला गेला. परंतु, तोपर्यंत सोशल मीडियात हा फोटो व्हायरल झाला होता.