पुण्यातील ‘पाटील इस्टेट’ झोपडपट्टीत पुन्हा ‘आग’ ; ६ घरं जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही महिन्यांपूर्वी झालेल्या आगीच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच सोमवारी मध्यरात्री १२ वाजता पाटील इस्टेटमधील घरांना पुन्हा आग लागली. अग्नीशामक दलाच्या आठ गाड्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग इतरत्र पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत ६ घरे संपूर्ण जळून खाक झाली आहे.

याबाबत अग्निशामक दलाने सांगितले की, मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांनी अग्निशामक नियंत्रण कक्षाला आगीच्या घटनेची खबर मिळाली. त्यानंतर कसबा, एरंडवणे, खडकी या केंद्रातून ७ अग्निशामक, ३ देवदूत आणि ४ वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. गाढ झोपेत असताना ही आग लागल्याने नागरिक प्रचंड घाबरले होते. आगीची तीव्रता वाढू नये, म्हणून आपल्या घरातील गॅस सिलेंडर घेऊन ते रस्त्यावर आले. आशाबाई शेटकर, अक्काबाई खवळे, आशा जगताप, सनी खवळे यांच्यासह ६ जणांची घरे या आगीत जळून भस्मसात झाली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर आग लागलेला संपूर्ण भागावर १ तास पाणी मारुन थंड करण्यात आला.

पाटील इस्टेट येथील झोपडपट्टीत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भर दिवसा मोठी आग लागली होती. त्यात 200 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या लोकांचे संसार सावरण्याचे काम सुरु असतानाच आता पुन्हा पाटील इस्टेटमध्ये आगीची घटना घडली. सुदैवाने ही आग इतरत्र न पसरल्याने मोठी हानी टळली आहे.