दारुड्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर केले कत्तीने सपासप वार, बीड जिल्ह्यातील घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – दारूड्या पतीने चक्क सासरी जाऊन तुला नांदायचे नाही का ? असा जाब विचारात झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर कत्तीने सपासप वार (Attack) केल्याची धक्कादायक घटना देवळाली पानाची (ता. आष्टी, जि. बीड ) जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जया सुरेश पवार असे जखमी महिलेचे नाव आहे. जया यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश पवार याच्याविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केली नाही.

अंभोरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयाचा पती सुरेश अंकुश पवार याला दारूचे व्यसन होते. तो कायम दारुच्या नशेत असतो. दारुडा पती सुरेश पवार हा पत्नीला कायम मारहाण करत होता. याच जाचाला कंटाळून जया गेल्या दीड महिन्यापासून माहेरी अर्थात देवळाली पानाची येथे राहायला आली होती. मंगळवारी (22) रात्री जया मुलांसह घरासमोरील ओट्यावर झोपली असतानाच रात्री 10 वाजताच्या सुमारास सुरेश मद्यधुंद अवस्थेत आला.

जयाला झोपेतून उठवत ‘तुला नांदायचे नाही का? असा जाब विचारात त्यानं तिच्या चेहऱ्यावर कत्तीनं सपासप वार करून गंभीर जखमी केले. जयाची आरडाओरड ऐकून तिची मुल आणि बहीण उठली. आईला मारू नका, असे मुलं गयावया करत असतानाही सुरेशने लाथाबुक्क्यांनी जयाला बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. एवढच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. अंभोरा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.