चारित्र्यावर संशय घेऊन त्यानं पत्नीला जिवंत पेटवलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगर शहरातील भारतनगर येथून धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील कॅम्प नंबर -४ येथील भारतनगर मध्ये राहणाऱ्या एकाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत तिला मारहाण केली, त्यानंतर तिच्या अंगावर डिझेल टाकून तिला पेटवून दिले. आत्माराम पवार असे या आरोपी पतीचे नाव असून पत्नी सुमन 75 टक्के पेक्षा जास्त जळाली आहे. तिला उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस फरार पती आत्मारामचा शोध घेत आहेत.

आत्माराम पवार (35) आपल्या कुटुंबासह भारतनगर येथे राहत होता. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्री साडे बारा वाजता आत्माराम दारूच्या नशेत घरी आला. आत्माराम नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे तो तिला रोज शिवीगाळ करत मारहाण करत असे. घटनेच्या रात्रीही त्याने हाच गोंधळ सुरु केला. संतापलेल्या आत्मारामने घरातील डिझेल सुमनच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. आग लागताच सुमन जीवनाच्या आकांताने ओरडत पळू लागली. शेजाऱ्यांनी अंगावर पाणी टाकून जीव वाचविण्याचा पर्यंत केला. दरम्यान, सुरवातीला शहरातील मध्यवर्ती रूग्णालयात सुमनवर उपचार सुरू होते, मात्र , 75 टक्के पेक्षा जास्त जळाल्याने सुमनच्या तब्येतीत अजून बिघाड झाल्याने तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले.

सुमन रुग्णालयात मुत्यूशी झुंज देत आहे. तिने दिलेल्या जबानी नुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी पती आत्माराम पवार यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस आता फरार आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like