Baramati : राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीनं होमगार्डच्या पायावर घातली चारचाकी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व वाहन तपासणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीनं होमगार्डच्या पायावरून गाडी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती शहरातील पेन्सिल चौकात गुरुवारी (दि 5) दुपारी 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. या नगरसेविकेच्या पतीनं धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील नगरसेविकेच्या पतीची धुलाई केली.

बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी होमगार्ड हे बारामती एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात बेशिस्त वाहनांवर कारवाई करत होते. नगरसेविका पतीसह यावेळी चारचाकी वाहनातून येत होती. यावेळी हे चारचाकी वाहन होमगार्डच्या पायावरून गेलं. याावेळी पोलिसांनी त्या नगरसेविकेच्या पताली गाडी थांबवण्यासाठी विनंती केली. तरीही त्यांनी गाडी थांबवली नाही. यावेळी पोलिसांनी धावत जाऊन गाडी रोखली. त्यांना गाडीच्या बाहेर येण्यास सांगितलं असता ते बाहेर येत नाही हे पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीची चावी काढून घेतली. यावेळी नगरसेविकेच्या पतीनं पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. नंतर पोलिसांनीही वर्दीचा हिसका दाखवला असं अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितलं.

ही घटना समजल्यानंतर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आणि राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर तालुका पोलीस ठाणं ठाम राहिलं. पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात येत आहे.