पुण्यात दाम्पत्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – २० दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मासे विक्री करणाऱ्या दाम्पत्याला ११ जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून मारहाण करत पतीवर कोयत्याने सपासप वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मांजरी येथे घडली.

याप्रकऱणी रेणुका दिलीप ढिले (वय ४५, रा. मांजराई नगर, मांजरी बुद्रूक) यांनी फिर्याद दिली आहे. तर या घटनेत त्यांचे पती दिलीप ढिले हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकऱणी एखूण ११ जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेणुका ढिले आणि त्यांचे पती हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान ते दोघे रविवारी रात्री मासे विक्री करून साडेनऊच्या सुमारास मांजराई नगर येथील घरी मोटारसायकवरून परतत होते. दरम्यान २० दिवसांपुर्वी मुंढवा येथे त्यांची काही लोकांसोबत भांडणं झाली होती. त्यातीलच १० ते ११ जणांच्या टोळक्याने दाम्पत्याची दुचाकी अडवली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दिलीप ढिले यांना मारहाण करत त्यांच्या डोक्यात आणि मानेवर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केला. तसेच रेणुका ढिले यांच्यावरही धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. मात्र दोघेही या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षत बी. डी. गाडे करत आहेत.