‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन-एजिथ्रोमायसिन घेणं होऊ शकतं धोकादायक, रिपोर्ट मध्ये दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी आणि औषधोपचार करण्यासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस तयार केलेली नाही. मात्र जगभरात वेगवेगळ्या औषधांचे मिश्रण करून त्याचा परिणाम कमी करण्याचे अनेक दावे केले जात आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि एजिथ्रोमायसिनच्या वापरावर सर्वाधिक जोर दिला गेला आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनानंतर जगभरात त्याची मागणी वाढली.

मात्र, बर्‍याच वेगवेगळ्या अहवालांमध्ये या औषधांना धोकादायक सांगितले जात आहे आणि कोरोना रूग्णांवर न वापरण्याची सूचना दिली जात आहे. असाच एक अहवाल वंडरबिल्ट युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रसिद्ध केला आहे ज्यात म्हटले गेले आहे की, कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि एजिथ्रोमायसिनचे एकाच वेळी सेवन घातक होऊ शकते आणि हे हृदयावर गंभीर परिणाम करू शकते.

अमेरिकेतील या दोन्ही विद्यापीठांमधील संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या डेटाबेसचे निरीक्षण केले, ज्यात औषधांच्या दुष्परिणामांसंबंधी २१ कोटी प्रकरणे नोंदली होती. या अहवालांमध्ये १४ नोव्हेंबर १९६७ ते १ मार्च २०२० दरम्यानच्या १३० देशांमधील उपचारांच्या अहवालाचा समावेश आहे.

अहवालात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, एजिथ्रोमायसिन किंवा दोन्ही औषधे घेतलेल्या रूग्णांच्या हृदयावरील औषधांच्या दुष्परिणामांचा अभ्यास केला गेला आहे. संशोधकांनी सांगितले की, कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि एजिथ्रोमायसिन वेगळे किंवा एकत्र घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यांनी सांगितले की, प्रामुख्याने एजिथ्रोमायसिन पण हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या सेवनाने देखील हृदयाच्या गतीमध्ये होणारे बदल यांसारखे घातक परिणाम पाहायला मिळाले आहेत.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, या दोघांच्या एकत्र सेवनाने आणखी तीव्र परिणाम दिसून आले. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपर्यंत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेतल्यामुळे प्राणघातक हृदयविकाराचा झटका येण्याचे परिणाम देखील झाले. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा वापर मुख्यतः मलेरियाच्या रुग्णांसाठी केला जातो आणि भारतात हे मोठ्या प्रमाणात तयार केले जाते.