मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामागे धोनी कनेक्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषीत केले. भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनने अनेकवेळा खोडा घातला होता. मात्र, यावेळी चीनने भारताच्या प्रस्तावावरील हरकत मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

भारताचे राजदूत आणि संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सुरक्षा परिषदेसमोर भारताची बाजू भक्कमपणे मांडली. यानंतर आपली प्रतिक्रिया देताना सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले कि, सुरक्षा परिषदेसमोर भक्कमपणे बाजू मांडण्यामागे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र धोनीचा प्रभाव असल्याचे म्हटले आहे.

सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले की, कधीही वेळ निघून गेली आहे असे समजू नका, तसेच लवकर पराभव स्विकारू नका, या धोनीच्या विचारानुसार मी सुरक्षा परिषदेत भारताची बाजू मंडल्याचे अकबरुद्दीन यांनी सांगितले. अझरला जागतिक दहशतवादी घोषीत केल्यानंतर त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना म्हणाले.

पुढे सांगताना सय्यद अकबरूद्दीन म्हणाले, मी धोनीच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारा आहे. एखाद्या ध्येयाचा पाठलाग करताना आपल्याला वाटतो त्याहून अधिक वेळ आपल्याकडे असतो. त्यामुळे वेळ संपत आलाय असे समजू नये किंवा खचून जाऊ नये. या धोनीच्या विचारानुसारच मी प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मसूद अझरचा संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत समावेश करण्यात आला आहे. सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत, असे ट्विट सय्यद अकबरुद्दीन यांनी निर्णयानंतर केले.