‘कोरोना’ लशीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची मोठी घोषणा !

वॉशिग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेतील सर्व प्रौढ नागरिक १ मे नंतर लस मिळण्यास पात्र ठरणार आहेत. चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला असून आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या एकट्या अमेरिकेत ३ कोटींपर्यंत पोहचली आहे.

११ मार्च अखेर अमेरिकेत २ कोटी ९९ लाख २५ हजार ९०२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जगातील सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहेत. त्याचबरोबर सध्या अमेरिकेत दररोज ६० ते ६२ हजार नवीन कोरोना बाधितांची भर पडत आहे. सध्या अमेरिकेत ८५ लाख ८४ हजार ८८३ जण सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ५ लाख ४३ हजार ७२१ जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्याचा उपाय म्हणून लशीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न अमेरिकन सरकारचा आहे. त्यामुळेच आता १ मे पासून सर्वांना लस घेता येणार आहे.

याबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की, मला माहिती आहे, हे खूप कठीण आहे, पण ही गोष्ट खरी आहे. दुसरे महायुद्ध, व्हिएटनाम युद्ध आणि ९/११ च्या घटनेत जेवढे मृत्यु झाले नाही, त्यापेक्षा अधिक मृत्यु कोरोनामुळे अमेरिकेत झाले आहेत. एक वर्षापूर्वी या विषाणुची लागण आपल्याला झाली. सुरुवातीला काही आठवडे, त्यानंतर महिन्यांपासून नकारार्थी भूमिका, त्यामुळे अधिक मृत्यु, अधिक तणाव आणि एकाकीपणा आला. प्रत्येकासाठी हे भिन्न असले तरी आपण सर्वांनी काहीतरी गमावले आहे. सर्वांना एक सामुहिक त्याग करावा लागला आहे.