प्रेरणादायी ! वडिलांनी घर विकून UPSC च्या तयारीसाठी पाठवलं अन् पहिल्याच प्रयत्नात पोरगं झालं IRS नंतर बनला IAS

पोलीसनामा ऑनलाइन टीम – UPSC च्या वतीने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेत देशातून 26 वा क्रमांक पटकावलेल्या प्रदीप सिंह यांची कहाणी प्रेरणादायी आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या प्रदीपची घरची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. वडिलांनी घर विकून प्रदीपला UPSC च्या तयारीसाठी दिल्लीला पाठवले होते. याची जाणीव ठेवत प्रदीपने पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्याने दीड वर्ष दिवसरात्र एक करन परीक्षेची तयारी केली अन् पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पासही झाला. परंतु रँकनुसार त्याला आयआरएस सेवा मिळाली. लहानपणापासूनच त्याचे स्वप्न एक IAS अधिकारी होण्याचे होते. म्हणूनच त्याने दुसरा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा देशातून 26 वा क्रमांक आला अन् त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

प्रदीपने एका मुलाखतीत याविषयीची उलगडा केला आहे. त्याने UPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्लाही दिला आहे. UPSC मध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला धैर्याने सतत मेहनत करावी लागेल. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक रणनिती आखावी लागेल. त्याची अंमलबजावणी करून तुम्हाला यश मिळवता येईल. अनेकदा आपल्याला यात अपयशही येते. परंतू त्यातून निराश होण्याची गरज नाही. कठोर मेहनत ही तुम्हाला एक दिवस यश मिळवूनच देईलच, असा सल्लाही त्याने दिला आहे.